नमस्कार 🙏
काल रात्री चार वाजेपर्यंत अतिशय उत्कंठेने आपल्या वैज्ञानिकांच्या यशाची कामना करीत, टीव्ही वर चंद्रयान 2 च्या विक्रम लैंडर च्या सुखरूप उतरण्याची वाट पाहत होतो. काल रात्रीच श्री कोष्टीजीं च्या चंद्रयान विषयी ब्लॉगवर शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. कल्पना करा त्या वैज्ञानिकांच्या मनस्थिती ची , ज्यांनी अनेक जागवलेल्या रात्रींच्या अविश्रांत श्रमाचे, आणि आपल्या देशासाठी जिवाचे रान केलेल्या त्यांच्या अडीच वर्ष मेहनतीचे. अगदी थोडक्या दोन किलोमीटर अंतरावर पोहोचून हातचे यश (कदाचित ….. लक्षात ठेवा की विक्रम बरोबर आपले फक्त कम्युनिकेशन तुटले आहे, याचा अर्थ असा कि मिशन सर्वस्वी अपयशी ठरले असे मी तरी अजून समजत नाही.) थोडक्यात हुकले असावे, याचे मलाच नव्हे तर आपण सर्वांना व सर्व देशाला थोडे नैराश्य वाटले. तरीही किंचितसे विज्ञान कळत असल्यामुळे, आपण हे समजू शकतो कि लहान-सहान प्रयोग करण्यात सुद्धा यशाची 100% हमी नसते.
येथे तर लक्षावधी कंपोनेण्ट्स ने तयार केलेल्या चंद्रयान 2 मध्ये, कोट्यावधी प्रयोगांचा एकत्र समावेश होता, त्यामध्ये कदाचित एक चूक झाली असावी, तर त्या करिता राष्ट्रीय अस्मितेची मान खाली घालवण्याची काहीच गरज नाही. उलट आपण सर्वांना आपल्या वैज्ञानिकांच्या अतिशय अभिमान आहे, आणि असलाच पाहिजे. लक्षात ठेवा हा आपला पहिला प्रयत्न होता. (चंद्रयान 1 हे फक्त अॉर्बिटर लैंडर होते, ते चंद्रयान 2 प्रमाणे एक कंपोझिट अॉर्बिटर लैंडर+रोवर मिशन नव्हते.) आणि आपण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की यापूर्वी ज्या पांच देशांनी असे प्रयत्न केले त्यात यशाची टक्केवारी फक्त ५९% टक्के आहे.
आपल्या वैज्ञानिकांना त्यातही अडथळे बरेच होते, लँडिंग साईट तयार करण्या पासून अगदी रॉसकॉसमॉस (रशियन स्पेस एजन्सी) ने वेळेस मदतीचा हात मागे ओढून घेण्या पर्यंत. तशातही चंद्रमा वर पृथ्वीच्या कक्षेतून कमीत कमी अंतराचा कोण साधून, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे आणि तिथे उतरणे,या करता जी नेमकी संक्षिप्त वेळ (विंडो) लागते ती दोनदा तांत्रिक बिघाडां मुळे हुकल्याने, आपल्या वैज्ञानिकांनी मनाचे धैर्य व स्थैर्य अजिबात ढळू न देता, जो प्रयत्न केला , तो खरोखर स्पृहणीय आहे. म्हणून,आपल्या सर्व वैज्ञानिकांच्या ह्या अविश्रांत मेहनतीचे, धैर्याचे तितक्याच कौतुकाने मी तरी अभिनंदन करतो.
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत |
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यता दुर्गमं
पथकस्तत्कवयो वदन्ति ||
[परत उठा, जागे व्हा, आणि अधिक ज्ञान मिळवा. ज्ञान आणि ध्येय मिळावं अशी इच्छा असणाऱ्या लोकांचा मार्ग धारदार सुरीवरून चालण्याएवढा कठीण असतो.
ध्येय ठरलेले असेल तर मार्ग कठीण असला तरी तो चालण्याचे बळ मिळतेच. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय कोणतेच ज्ञान मिळणे अशक्य!]
जय हिंद.