पुस्तक मित्र :१
पुस्तकें ही गेल्या शतकातील मानवाचे सर्वात मोठे मित्र. गेल्या शतकातील या करिता म्हणालो, कारण आजकाल कंप्यूटर, स्मार्टफोन या मधून मनुष्याला जर उसंत मिळाली तर तो काही लेखी साहित्य वाचायला मोकळा होणार. पण बहुसंख्य पासष्ट,सत्तर वया पर्यंत चे लोक , कीबोर्ड वर टिक टिक, टुक टुक करण्यातच गुंग असतात.नंतर जेव्हां जीवनात थोडा निवांतपणा येतो, तेव्हां हळू हळू दृष्टी चा त्रास द्यायला लागते. मग असे लोक शेल्फ पर्यंत जाऊन कागदी पुस्तकें काढणार काय, आणि वाचणार काय ? त्यातल्या त्यात जे अगदीच वाचनवेडे आहेत, त्यांच्या करिता किंडल,कोबो वगैरे कंपन्यांनी ई-बुक रीडर नावाचे मोठे मोबाईल वजा इलेक्ट्रॉनिक पुस्तक काढले आहे. ते बरे असते, कारण त्या मध्ये अक्षरांचा आकार (फोन्ट साइज) पानाचा चमकदारपणा (ब्राईटनेस) वगैरे बदलता येतो, त्या मुळे लोकांनाही वाचणे बरेच सोपे होते. अर्थात त्याच्यात सुद्धा गोम आहेच ! जर तुम्हाला इंग्रजी पुस्तकं वाचायचे असतील तर त्यात भरपूर चॉईस आहे, पण ज्यांना मराठी व हिन्दी पुस्तकें वाचायची आहेत, ती संख्या अगदीच थोडी आहे. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये बरीच मराठी पुस्तकें पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध होऊ लागली आहेत.अशा प्रकार चे बदल ही वेळेची गरज आहे.कार्बन फुटप्रिंट्स जर कमी करायचे असतील तर बांबू आणि लाकूड यांपासून तयार होणार्या पारंपरिक कागदा चा उपयोग आता कमीत कमी करणे ही पृथ्वी वाचविण्याची गरज झाली आहे. हळू हळू जगातील बर्याच मोठ्या मोठ्या लायब्रर्या आता डिजिटल होऊ लागल्या आहेत. भारतात सुद्धा वर्ष बऱ्याचशा विद्यापीठांच्या लायब्ररी, ई-लायब्ररी मध्ये परिवर्तित होत आहेत. याचा भावनिक भाग आपण नंतर केव्हा तरी पाहू.पण ह्या नवीन प्रगत शास्त्रा मुळे तीन मुख्य फायदे झाले आहेत. एक तर अशी प्राचीन पुस्तकें, ज्यांची एकच प्रत हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे, त्यांच्या हुबेहूब मूळ हस्तलिपित डिजिटल प्रति,अनेक लोकांना एकाच वेळेस उपलब्ध होऊ शकतात. दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या वजन आणि आकाराच्या तुलनेत अशी ई-पुस्तकें अतिशय सूक्ष्म जागेत साठवली जाऊ शकतात. तसेच किंमतीच्या दृष्टीने कागदावरील छापील पुस्तकांच्या मानाने डिजिटल पुस्तकांची किंमत नगण्य असते. आजकाल बहुतेक सर्व ई-लायब्ररीज फिजिकल मेमरी शिवाय वर्च्युअल क्लाऊड मध्ये सुद्धा साठवलेल्या असतात. तोटेही अर्थात आहेतच.मुख्य तोटा आर्थिक आहे आणि तो बिचाऱ्या लेखकांच्या वाट्याला येतो. कागदी पुस्तकांच्या मानाने, अजून तरी इलेक्ट्रॉनिक लेखनाला तेवढा मोबदला मिळत नाही, हे कटू सत्य आहे. दुसरी गोष्ट आपल्या येथील डिजिटल वारसा व लेखन , अजून सायबर कायद्याच्या दृष्टीने बरेच असुरक्षित आहे.त्यामुळे कॉपीराईट घेऊन सुद्धा, अनेक वेळा ई-पायरसी व फिशिंग मुळे, तसेच हॅकर मंडळीच्या उपद्व्यापां मुळे, लेखक आणि मूळ डाटा यांचेही अतोनात नुकसान होते. पाणी पाऊस वारा इत्यादी पंचमहाभूतें व सहावे म्हणजे चोर, कीटक आणि उंदीर, हे मिळून एखाद्या कागदी पुस्तक लायब्ररीचे जितके नुकसान वर्षभरात करू शकत नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान एक अदृश्य वायरस एखाद्या डिजिटल लायब्ररी चे क्षणार्धात करून टाकतो. असो, या सर्वां मधून सुद्धा हळू हळू मार्ग निघतीलच. ही गोष्ट तर नक्कीच, कि भविष्यात, स्वतःला व्यक्त करण्याचे लेखन हे माध्यम आपल्याला कागदा पेक्षा स्क्रीन वरच अधिक पाहायला मिळणार . एक लहानसे उदाहरण देऊन आपल्या गप्पा येथेच संपवू. खाली एक वेब लिंक शेअर करत आहे, त्यावर टिचकी मारून तुम्ही किती तरी पुस्तकें व लेख वाचू शकता. विशेष करून असे वाचक ज्यांना श्री शिवछत्रपती यांच्या विषयी साहित्य वाचायला आवडत असेल.
(अर्थात हे सांगण्याची गरज नाही, कि अशा लिंक्स कॉपीराईट प्रोटेक्टेड असतात आणि म्हणून त्यावेळी साहित्याचा किंवा माहितीचा उपयोग केवळ स्वतःच्या वाचना करता करावा. त्याच्या प्रती काढून त्यांचा व्यवसायिक उपयोग हा एक गुन्हा आहे.)
(साभार गुगल,
discovermh.com आणि इतर संबंधित सर्व स्रोत)
**************************
सर, खूपच माहिती पूर्ण पोस्ट आहे ही. वाळवी आणि वायरस छान तुलना केली आहे आपण. सर पुस्तके छापल्याने निसर्गाचे नुकसान होते. ते डिजिटल ने टळते. डिजिटल लायब्ररी उपलब्ध आहेत च. काही डिजिटल मासिकं मोफत उपलब्ध असतात. असो.
LikeLike