तात्या – माझे मोठे भाऊ          (भाग एक) 

तात्या – माझे मोठे भाऊ
          (भाग एक) 

            निरपेक्षपणे कोणाचे व्यक्तीचरित्र लिहिणे अतिशय अवघड काम आहे. पण तेच काम एका नात्याच्या दृष्टिकोनातून लिहायचे म्हटले तिथे मग बरेच सोपे होते, तसेच जर त्या व्यक्ती विषयी, तुमच्या संबंधात अतिशय जिव्हाळा व आपुलकी असेल तर मग विचार उमटवणे खूप सोपे होते. माझे मोठे भाऊ, तात्या गेल्या वर्षीच , तीन मे (2019) रोजी आमची 74 वर्षाची साथ सोडून ब्रह्मलीन झाले. 2013 साली सर्वात मोठी बहीण (सुशीला)ताई, नंतर गेल्या वर्षी प्रदीर्घ अशा आजारा नंतर, तात्या गेल्या मुळे एक मोठी पोकळी आल्या सारखे भासते.
            पूर्वी कुटुंबे बरीच मोठी असायची, बहुदा दोन किंवा तीन भावंडे, किंवा अधिक ही, असणे हे  फारसे वावगे समजले जात नसे. मी 1910 ते 1960 च्या काळातील गोष्टी करीत आहे.
             आता मी आम्हां भावंडां विषयी आणि विशेष करून तात्यां विषयी सांगण्या पूर्वी एकंदर परांजपे घराण्याची व आमच्या कुटुंबाची त्रोटक पण आवश्यक अशी माहिती प्रथम देतो. तात्यां ची माहिती तर मुख्यत्वे करून आहेच, पण काही आवश्यक अशी अवांतर माहिती, पुढच्या पिढ्यांना ज्ञात असावी म्हणून देत आहे, म्हणून हा लेख कदाचित अधिक लांब होईल अशी भीती आहे, तरी त्या बद्दल क्षमस्व.
      परांजपे हे चित्पावन ब्राह्मण, अर्थातच, मूळ कोकणचे राहणारे व सर्व परांजपे(परांजप्ये), देव, मंडलिक, किडमिडे, नेने व मेहेंदळे यांचे गोत्र विष्णुवृद्ध, वेद ऋग्वेद, सूत्र आश्वलायन, शाखा शाकल.तसेच विष्णुवृद्ध गोत्राचे आ॑गिरस, पौरुकुत्स्य, त्रासदस्यव, असे तीन प्रवर आहेत. मूळ सर्व परांजपे कोकणातील आडिवरे ह्या गावचे. आडिवरे येथील देव श्री लक्ष्मीनारायण आणि श्री महाकाली हे आमचे कुलदेवता आणि कुलदेवी होय.परांजपे घराण्याच्या एकंदर 102 शाखा आहेत. जसेजसे परांजपे यांचे मूळ पुरुष आडिवर्‍या होऊन इतर गावी स्थानांतरित होऊन तिथे स्थायिक झाले त्याप्रमाणे या शाखा तयार झाल्या.आमची 56 वी शाखा कोकणातील मुर्डी गावी स्थलांतरित झाली त्यामुळे आम्ही मुर्डीचे परांजपे म्हणविले जातो. चार पिढ्यां पूर्वी आमच्या खापर पणजोबाना मुर्डी  जवळ शेरवली या गावची बारा आणे वतनदारी मिळाली. त्या मुळे ते शेरवली येथे राहू लागले. पण वतनदारी गेल्या मुळे पुढच्या पिढ्या देशावर येऊन सांगली, सातारा या भागात वास्तव्य करून होत्या. या कारणाने तीन पिढ्यां पूर्वी पासून कोल्हापूरच्या करवीरवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांना आम्ही कुलदेवी मानतो.
              वरील माहिती मुख्य करून व्यक्तिचित्रात अशा दृष्टीने दिली आहे, कि तात्यां विषयी एक परांजपे म्हणून जाणून घेण्या पूर्वी परांजप्यांच्या मुर्डी शाखेतील नवव्या पिढीतील या व्यक्तीची पिढीजात पृष्ठभूमि कशी काय होती, हे माहीत असणे आवश्यक आहे.
        आम्ही एकंदर पाच भावंडे. माझे वडील ति.कै. पांडुरंग श्रीधर परांजपे व आई  कै.कमलाबाई परांजपे, हे दोघेही कोकणातून देशावर आलेले.पूर्वीचे बर्‍या पैकी सधन कुटुंबातील,पण दोघांचे ही वडील त्यांचा लहानपणीच गेल्या मुळे,इतर नातलगांनी जवळ जवळ सर्व मालमत्ता गिळंकृत केली. आमच्या वडिलांची आई सुद्धा लहानपणीच वारली, त्यामुळे ते आठ दहा वर्षाचे असल्यापासून त्यांना आपल्या मोठ्या भावाचाच आधार होता. आमचे मोठे चुलते श्री दत्तात्रय श्रीधर परांजपे, यांनी व्हर्नेक्युलर फायनल (७ वी बोर्ड) झाल्या नंतरच मुंबईत नोकरी धरली,व आपल्या धाकट्या भावाला, आमच्या वडिलाना, इलेक्ट्रिकल इंजिनियर केले. आमची आई व आजी आमच्या मामां जवळ राहिली. आईचे शिक्षण त्या काळचा रीतिप्रमाणे चौथी पाचवी पर्यंतच झाले. 1931 साली नोव्हेंबर महिन्यात, मुंबई मध्ये, अतिशय साधेपणाने त्यांचा विवाह झाला व तेव्हांच, आमची आई ‘गोदावरी’ बसून ‘कमला’ झाली.
         1933 साली त्यांचे पहिले अपत्य , म्हणजेच सुशीला हिचा जन्म इगतपुरी येथे झाला. सर्व भावंडात ती मोठी म्हणून तिला ‘ताई’ हे नाव 1935 साला पासून तिच्या बरोबर चिकटले ते कायमचेच, कारण याच वर्षी वसई येथे मंदाकिनी हिचा जन्म झाला, तिला आम्ही सर्व लहान भावंडे मंदाताई ह्या नावाने संबोधतो, आता ती 84 वर्षांची असून, आपल्या सासरी आपल्या पती श्रीयुत मधुकर राव कुलकर्णी यांच्या बरोबर, राजेंद्रनगर इंदूर येथे राहते.तिने सुशिला ताईंना प्रथम ‘ताई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली व ती तेव्हां पासून, अगदी आमच्या आई दादां पासून, सर्व जगाची ‘ताई’ झाली.
      आमचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते, आपल्या कामा मध्ये अतिशय निष्णात आणि प्रामाणिक होते. त्या वेळेस आजकाल सारखे प्रत्येक प्रांताचे एलेक्ट्रिसिटी बोर्ड नव्हते.त्या मुळे प्रत्येक शहरात प्रायवेट कंपन्यांची पॉवर हाऊसेस असायची.त्यांनी इगतपुरी,वसई,बर्‍हाणपूर,खंडवा व हरदा येथील पॉवर हाऊसेस बांधून सुरू केली.
         मामा, मामी गेल्या नंतर आमच्या आजी (ति.कै.यमुनाबाई लिमये) सुद्धा आमच्या बरोबरच रहात असत.पाठोपाठ दोन मुली झाल्या, मुळे जुन्या पिढीतील लोकां प्रमाणे त्यांचा ही मुलीं वर बराच राग असायचा.त्या मुळे
20 सेप्टेंबर 1937 ला जेव्हां हरदा येथे असताना अरुण (तात्यांचा) चा जन्म झाला , तेव्हां सहाजिकच सर्वात जास्त आनंद आजींना झाला. तात्यांचे बालपण आजींच्या कोडकौतुकात गेले.1943 पर्यंत हरद्या ला काम केल्या नंतर, दादांनी काही दिवस नागपूर येथे स्वतःचा उद्योग सुरु करायचा प्रयत्न केला.याच सुमारास दुसरे महायुद्ध चालू असल्या मुळे त्यांना ऑर्डिनेंस सर्विसेस मध्ये कटनी च्या ऑर्डनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी) मध्ये नोकरी लागली.त्यामुळे सर्व कुटुंब नागपूरहुन मध्यप्रांतातील कटणी ला शिफ्ट झाले. त्या वेळेस ताई व मंदाताई दोघीजणी प्रायमरी मध्ये शिकत होत्या.सुरुवातीला कटणी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये शाळा नव्हती, त्यामुळे छोट्या अरुणना पाच-सहा किलोमीटर लांब कटनी शहरात वेगळ्या शाळेत घालणे शक्य नव्हते. मंदाताई व ताई ज्या शाळेत जात असत, ती शाळा बार्डस्ले गर्ल्स स्कूल, ही जरी मुलींची शाळा होती, तरीही तिथे चौथी पर्यंत को-एज्युकेशन होते. त्यामुळे सहाजिकच, जवळजवळ चार वर्षें,ते त्या दोघीं बरोबरच बार्डस्ले गर्ल्स स्कूल मध्ये शिकले.1947 मध्ये जेव्हां ऑर्डनन्स फॅक्टरीची स्वत:ची शाळा सुरू झाली, तेव्हां ते तिथे शिकू लागले.1947 च्या शेवट पासून 1951 मध्ये काही दिवस, सातवीला पोहोचे पर्यंत, त्यांचे शिक्षण याच शाळेत झाले. 51 साली ते सातव्या वर्गात, कटणी (हिंदीतील नाव कटनी) शहरातील साधुराम हायस्कूल नावाच्या शाळेत दाखल झाले.वडिलांच्या नोकरीत एका जागेचे स्थैर्य नसल्याने, आम्हां पाची भावंडांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तरी, अनेक जागांवर वाटून, वेगवेगळे शाळां मधून झाले. 1951 सालाच्या शेवटी ही असेच झाले. दादांची तात्पुरती बदली (ट्रान्सफर) ऑर्डनन्स फॅक्टरी कटनी येथून सहा महिन्यां करिता ऑर्डनन्स फॅक्टरी खमरिया, जबलपूर येथे झाली. सुरवातीला (कारण कटणी चा क्वार्टर फॅक्टरी ने दादांच्या नावावर ठेवला होता.) दादा एकटेच त्यांच्या सरदार बलवंतसिंग गावाच्या शिख सहकाऱ्यासह खमरिया जबलपूरला गेले. त्या वेळेस दुसर्‍या महायुद्धा नंतर सर्व ऑर्डिनेंस ट्रॅक्टरांचे नविनीकरण सुरू होते, व सर्व फॅक्टरीज मध्ये डी.सी सप्लाय ऐवजी ए.सी सप्लाय ची पॉवर हाऊसेस (व त्या प्रमाणे सर्व मशिनरी सुद्धा) बदलण्याचे करण्याचे काम सुरू होते. दादा, माझे वडील या कामा मध्ये तज्ञ होते,त्यामुळे येथे या प्रकारचे कन्व्हर्शन सुरू असेल, तिथे त्यांची बदली होत असे. वर या बदलीला मी तात्पुरती या करता म्हटले आहे,कारण कटनी ऑर्डनन्स फॅक्टरी चे सुपरिंटेंडेंट (त्यावेळेस जनरल मॅनेजर ला सुपरिंटेंडेंट हा हुद्दा होता.) दादांना रिलीव करायला तयार नव्हते.
सुरुवातीला असा कयास होता की हे काम सहा एक महिन्यात पूर्ण होईल, पण परदेशातून पॉवर हाऊस ची मशिनरी यायला बरेच दिवस लागणार, असे दिसल्यावर आमची आई व चौघे भावंडे (चि. प्रकाशचा जन्म 1954 साली भुसावळला झाला.) खमरिया जबलपूर येथे शिफ्ट झालो. तात्पुरती व्यवस्था असल्यामुळे बलवंतसिंग अंकल आणि दादांना चार खोल्यांचा एक क्वार्टर देण्यात आला होता.बलवंतसिंग अंकल हे एकटेच राहत असल्यामुळे, तीन खोल्यांमध्ये आम्ही पांचजण, आणि एका खोलीमध्ये ते राहत असत. अर्थात त्यांचे जेवण खाण आमच्या बरोबरच होत असे.मिश्रित संस्कृतीचे अतिशय मजेदार दिवस होते ते. तात्या जबलपूरला प्रसिद्ध अशा मॉडेल हायस्कुल मध्ये जवळजवळ एक-दीड वर्ष शिकले. मी मात्र अजून शाळेत जात नव्हतो, त्यामुळे तात्या सकाळी सिटी बस ने शाळेत जाऊन दुपारी तीन वाजेस्तो परत येत,तो पर्यंत माझा वेळ जाता जात नसे.1952 साली, दिवाळीच्या सुमारास, जेव्हां दादांचे काम संपून ते कटणीला परत गेले, तेव्हां ते वर्ष पूर्ण करण्यासाठी आजी, ताई व तात्या हे तिघे, जबलपूरलाच, घमापुर येथे एक घर भाड्यावर घेऊन काही दिवस तिथेच राहिले. हे तिघे कटणी ला  येतात, तोपर्यंत दादांची प्रमोशनवर ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे बदली झाली.भुसावळला त्या वेळेस हिन्दी माध्यमाच्या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा नव्हत्या व तात्यांचे चौथ्या इयत्ते नंतर चे शिक्षण हिन्दी माध्यमातून झाले होते. त्या मुळे आठवी पास होई पर्यंत कटणीच्या साधुराम हायस्कूल मध्येच शिकले. पण त्या नंतर मात्र तात्यांना जबलपूर येथील महाकोशल हायस्कूल (महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूलची हिन्दी माध्यमाची शाखा होती)मध्ये घातले. तिथे होस्टेल ची ही सोय होती. परत मोठ्या तीन भावंडांची, कुटुंबा बरोबर, ताटातूट झाली. तात्या इयत्ता नववी करता महाकोशल हायस्कूल चा होस्टेल मध्ये राहिले. तसेच ताई व मंदाताईंची रवानगी सागर विद्यापीठात कॉलेज शिक्षणा करता झाली, सागर विद्यापीठाची स्थापना डॉक्टर सर हरीसिंह गौर या ख्यातनाम बॅरिस्टर आणि शिक्षणतज्ञांनी केली होती.तिथे मुलींच्या हॉस्टेल ची वेगळी उत्तम सोय होती.आता भुसावळ ला  फक्त मी, दादा आणि आई असे तिघे गेलो. मी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या शाळेत जाऊ लागलो. इकडे जबलपूरला मात्र तात्यांना महाकोशलच्या होस्टेल मध्ये बरेच खडतर दिवस कंठावे लागले. महाकोशल चे होस्टेल मागील बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर होते. शाळेतील शिक्षण जरी व्यवस्थित असले, तरी हॉस्टेल मधील मेस मध्ये जेवणाची अतिशय आबाळ होत असे. अतिशय लाडात वाढलेल्या तात्यांना घरी भरपूर सकस आहार मिळत असे. इथे मेस मध्ये खडे असलेला भात, करपलेल्या पोळ्या व पाण्या सारखे पातळ वरण आणि जहाल भाजी असायची. तसेच प्यायचे पाणी, अंघोळीचे पाणी, आपआपले
खालच्या मजल्या वरून बादल्या भरून वर घेऊन जावे लागायचे. तशात गरम पाण्याने आंघोळीची सोय अजिबात नव्हती. हे सर्व असताना तात्यांच्या सोशिकपणा ची कमाल पहा, कि घरी लिहिलेल्या पत्रांतून या अखंड खडतर जीवना विषयी एक चकार शब्द नसायचा. मला अजूनही आठवते आम्ही ज्या भाड्याच्या घरात राहत होतो, तो ‘थिओडोर व्हिला’ नावाचा बंगला,15 बंगले नावाच्या भागात, प्रोटेस्टंट चर्च समोर होता.तो एका रिटायर झालेल्या एलवारिस नावाच्या गोवानीज रिटायर्ड रेल्वे गार्डचा होता . हे आजोबा ख्रिश्चन होते. वय जवळ जवळ 75 वर्ष, बायको नाही, दोघा मुलींची लग्न झालेली. पण हा गृहस्थ, आपल्या गोवानीज डुमिंग नावाच्या नोकरा व टायगर नावाच्या कुत्र्या बरोबर मजेत राहायचा. खाण्या पिण्याचा (!!) अतिशय  शोकीन ! यांच्या घरी नाताळची मोठी पार्टी होती. तितक्यात रात्री ‘पी एस परांजपे, तुमचा टेलिग्राम आहे’ – असे पुकारत पोस्टमन हजर झाला.त्या दिवसांमध्ये फोन इतके बोकाळले नव्हते, खरे तर अजिबातच नव्हते.त्यामुळे टेलिग्राम म्हटले की सर्वांच्या छातीत धस्स व्हायचे. दादांनी टेलिग्राम घेऊन उघडला.तात्यांच्या शाळेच्या प्राचार्यांचा टेलिग्राम होता. “Your son is sick, admitted to hospital.”मला वाटते , रात्रीचे नऊ, दहा वाजले असावेत. त्या काळी आज-काल सारख्या फार गाड्या ही नव्हत्या.भुसावळ येथून, मुंबई अलाहाबाद मार्गे जबलपूरला जाणारी कलकत्ता मेल त्या काळी सकाळी चार वाजता भुसावळला येत असे. दादा नको-नको म्हणत असतानाही,एलवारिस आजोबा तीन वाजता सकाळी विक्टोरिया बोलवून (विक्टोरिया ही चार चाकी घोडागाडी असायची) दादांना घेऊन स्टेशनवर गेले. भुसावळहून जाणाऱ्या मेल गार्डला सांगून त्यांची थेट जबलपूर पर्यंत फर्स्ट क्लास मधून जाण्याची व्यवस्था केली. तिसऱ्या दिवशी दादा तात्यांना घेऊन सामाना सकट परतले. आई तर त्यांना पाहून रडूच लागली, अगदी हाडांचा सापळा झालेला, दुबळा तात्या पाहून मलाही रडू आले. अर्थात, त्यावेळेस तो स्वतः चालत घरात आला. पण त्याला तत्काळ पलंगावर झोपविण्यात आले. एखाद तासा नंतर तो अगदी गुराने हंबरडा फोडल्या सारखा ओरडत, छाती दाबत उठला. त्या आधी दादांनी आम्हाला सांगितले होते की तात्यांच्या छातीमध्ये अचानक कळा यायला लागल्या व त्यामुळे त्यांना जबलपूरच्या विक्टोरिया हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. दादांनी त्यांची अवस्था पाहून त्यांच्या सामाना सकटच भुसावळला घरी आणले. थोड्या वेळाने दादांनी भुसावळ फॅक्टरीच्या डॉक्टर दत्ताना बोलावून त्यांना दाखवले.त्यांनी काही औषध दिली पण त्याने फार आराम झाला नाही. फक्त काळे आयोडेक्स लावून शेकायचे व डॉक्टर च्या पेन किलर गोळ्या घ्यायच्या, असे उपचार चालू होते. हृदया संबंधी काही आजार असावा या शंकेने डॉक्टर दत्तानी त्यांना रेल्वेच्या दवाखान्या मध्ये दाखवले. तिथेही काही उपचार करण्यात आले पण काहीच उपयोग झाला नाही. अगदी मुंबईच्या के ई एम हॉस्पिटल पर्यंत दाखवूनही काही फार बदल वाटत नव्हता. शेवटी डॉक्टर दत्तानींच घरी त्यांचा उपचार सुरू केला. वास्तविक आम्ही सर्वच त्यावेळी अतिशय घाबरलो होतो. ते जेव्हां कळवळून रडायचे  तेव्हा मलाही रडू फुटायचे.                        सकाळ-दुपार-संध्याकाळ     तिन्ही वेळेस औषधे व गरम आळशी चे पोटीस लावण्यात येत होते.’स्लोन्स लिनिमेंट’ ची छातीवर,पाठी वर मालिश होत असे. मला वाटते की 1954 च्या उन्हाळ्यात ते बरेच ठीक झाले. कळा येणे बंद झाले, भूक लागायला लागली व हिंडणे फिरणे सुरू झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या  बहिणींनी आपल्या भावाची यथायोग्य बडदास्त ठेवली.
        याच सुमारास भुसावळ ऑर्डिनेंस फॅक्टरीच्या क्वार्टर्सची डागडुजीचे काम पूर्ण झाले आणि दादांना ऑर्डनन्स फॅक्टरी च्या पॅक डेपो भागात क्वार्टर देण्यात आला,म्हणून आम्ही तेथे शिफ्ट झालो. ऑफिसर्स क्वार्टर्स म्हणजे वास्तविक ते कुठल्याही दृष्टीने बंगले नसून, मिलिटरी च्या जुन्या बैरेक्स होत्या. एकाला एक अशा चार मोठ्या खोल्या एक थोडी लहान खोली, मागील भागात स्वयंपाकघर समोर प्रशस्त रुंद व्हरांडा, समोर बगीच्या करता भरपूर जागा व मागील दारी अस्ताव्यस्त पटांगण व त्याच्या शेवटी दोन खोल्यांचे सर्वंट क्वार्टर्स होते. बाग करायला आणि खेळायला भरपूर जागा होती. तिथेच मागील दारी बॅडमिंटनचे कोर्ट आखून तात्यां बरोबर मी बॅडमिंटन खेळायला शिकलो.ऑर्डनन्स फॅक्टरी ही भुसावळ शहरा पासून जवळ जवळ चार किलोमीटर अंतरावर होती. त्याच वर्षी अर्थात 1954 साली भुसावळ ला देवकरण लक्ष्मीनारायण हायस्कूल ही हिंदी माध्यमाची शाळा सुरू झाली. अर्थात त्यांना नववीचे वर्ष परत रिपीट करावे लागले. भुसावळच्या डी एल हिंदी हायस्कूलच्या मेरिट बोर्डवर, 1957 सालच्या,शाळेच्या  पहिल्या मॅट्रिक बॅच चे टॉपर म्हणून ‘अरुण पांडुरंग परांजपे’ यांचे नाव अजूनही आहे. 1957 सालच्या उन्हाळ्यात दादा तात्यांना घेऊन मुंबईला गेले. मुंबईला ब्राह्मणवाडी, किंग्ज सर्कल, माटुंगा या चाळीमध्ये आमचे काका, दादांचे वडील बंधू श्री दत्तात्रेय श्रीधर परांजपे हे दोन खोल्यांच्या घरात राहत असत. तात्यांनीचे पुढील शिक्षण तिथून व्हावे असा त्यांचा मानस होता. तात्यांनी 1957 साली मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजच्या  फर्स्ट इयर – इंटर मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस बी.एस.सी हा कोर्स एकंदर चार वर्षाचा असायचा. त्यामध्ये दोन वर्षाची इंटर सायन्स व दोन वर्षाचा बी.एस.सी कोर्स असायचा.1958 साली त्यांनी जळगांवच्या मूलजी जेठा कॉलेज ला इंटर सायन्स सेकंड इयर मध्ये प्रवेश घेतला. दुर्दैवाने मुंबई येथे शिकण्याचा अनुभव फारसा चांगला ठरला नाही. सकाळी नाश्ता नाही, दहा वाजता कॉलेज असल्या मुळे बहुतेक दुपारचं जेवण, बाहेर काहीतरी थोडेफार खाऊन भागवावे लागे. एक कारण म्हणजे आमच्या काकूंचा स्वभाव. शिवाय अभ्यासाला अजिबात जागा नाही, असे अनेक त्रास वर्षभर त्यांना झेलावे लागले. त्यांनी 1959 साली एम.जे कॉलेज, जळगाव येथून इंटर सायन्स तसेच दोन वर्षांनी त्याच कॉलेज मधून बी.एस.सी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केले. 1961 साली त्यांनी एक वर्ष एम.जे कॉलेज, जळगाव येथेच केमिस्ट्री या विषयाच्या डेमॉन्स्ट्रेटर ची नोकरी केली.1962 साली त्यांनी इंदूर येथील होळकर सायन्स कॉलेज मध्ये एम.एस.सी मध्ये प्रवेश घ्यायचा प्रयत्न केला, पण पुणे विद्यापीठातून विक्रम विद्यापीठाला वेळेवर डोमिसाइल सर्टिफिकेट न पाठवलं गेल्या मुळे तो प्रयत्न हुकला. ऑगस्ट 1961 मध्ये ऍडमिशन मिळायची शक्यता संपल्या मुळे ते एक वर्ष त्यांनी बर्‍हाणपूरच्या गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल मध्ये विज्ञान शिक्षकाची नोकरी केली. 1962 साली त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून इंदूरच्या होळकर सायन्स कॉलेज मध्ये एम एस सी फिजिक्स प्रीवियस मध्ये प्रवेश घेतला. इथे हे विशेष लक्षात घेण्या सारखे आहे कि त्या काळामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे हे फार दुर्मिळ होते.आजकाल  लहान गावाच्या कॉलेजातून सुद्धा एम.एस.सी. किंवा इंजीनियरिंग कोर्स असतात. त्या काळात असे अजिबात नव्हते.त्या काळी मध्य प्रदेशात फक्त इंदोर, उज्जैन, जबलपूर, ग्वाल्हेर, रायपुर आणि सागर याच जागां वर पदव्युत्तर शिक्षण मिळत असे. त्या दृष्टीने तात्या, हे आमच्या पिढीतील पहिले पदव्युत्तर शिक्षण घेणारे ठरले,आणि वास्तविक त्यांच्या मुळेच मला आणि चि. प्रकाशला एम.एस.सी होता आले. 1964 साली त्यांनी अतिशय यशस्वी रित्या, म्हणजेच मेरिट मध्ये येऊन, एम.एस.सी इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण केले.1964 च्या उन्हाळ्या पासून,त्यांनी नोकरी साठी प्रयत्न सुरू केले. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्या दिवसात सामान्यपणे कोणीही शालेय स्तरावर नोकरी करणे पसंत करीत नसे. शक्यतो सर्वच एम.ए किंवा एम.एस.सी झालेल्या लोकांना झालेल्या प्रायव्हेट किंवा सरकारी कॉलेज किंवा इतर संस्थां मध्ये नोकरी सहज मिळत असे. या प्रयत्नां मध्ये त्यांनी अनेक जागां वर नोकरी करता अर्ज केले. पण  मनासारख्या पगाराची नोकरी न मिळाल्या मुळे त्यांनी मुंबईच्या बी.आय.इ.टी मधून रेडिओ इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कोर्स सुद्धा करून घेतला. 1962 च्या चीन भारत युद्धा नंतर , त्यावेळेस भारतात एकंदर आर्थिक मंदीची लाट होती. काय कारण असेल माहीत नाही, पण कदाचित या मुळेच 1962 पासून अनेक वर्षें मध्यप्रांत आणि महाराष्ट्रा मध्ये लोकसेवा आयोगाच्या (पी.एस.सी) नोकऱ्यांच्या जागा रिकाम्याच ठेवण्यात आल्या, त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अतिशय कमी झाली होती. मध्यंतरी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन, त्यांना आफ्रिकेतील एक देश लिबियाच्या राजधानी त्रिपोली येथील एका कॉलेजाने नोकरी देऊ केली. तिथेही सरकारी दिरंगाई  आडवी आली, आणि वेळेवर पासपोर्ट न मिळू शकल्या मुळे तेथे रुजू होऊ शकले नाही. शेवटी 65 सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात त्यांनी छिंदवाडा जवळील आमला येथील सैनिक स्कूलमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी केली. जेमतेम एक दोन महिने नोकरी केली असेल तेवढ्यात त्यांना मध्यप्रदेश शासना कडून शहडोल च्या मायनिंग पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये लेक्चरशिप मिळाली. एकंदर पाहता, एक अतिशय हुशार अशा मनुष्याला या बाबतीत मात्र परिस्थितीने वेळोवेळी अतिशय मानसिक त्रास दिला.शेवटी 1966 च्या एक फेब्रुवारीला ते शहडोल येथे सरकारी नोकरी मध्ये रुजू झाले. जीवनाच्या दुसर्‍या अध्याया चा हा भाग सुरळीत सुरू झाला आणि त्यांना जीवनात थोडी स्थिरस्थावरता प्राप्त झाली. मध्यंतरीच्या काळात 1965 मध्ये मंदाताईंचा विवाह राजेंद्र नगर, इंदूर चे श्रीयुत मधुकरराव कुलकर्णी यांच्या बरोबर संपन्न झाला. या विवाहात त्यांनी आपल्या आई-वडिलांना शक्यतो भरपूर आर्थिक सहाय्यही केले आणि कामात सुद्धा खूप जबाबदारीने हातभार लावला. दुर्दैवाने सर्वात मोठ्या बहिणीचे लग्न होऊ शकले नाही. जेव्हा तिने लग्नाला स्पष्ट नकार देऊन, आई-वडिलांना, आपण आपल्या मोठ्या मुलाचे लग्न करावे असे सांगितले, तेव्हा दु:खी अंत:करणाने, पण नाइलाजाने जगरहाटीला धरून त्यांनी आपल्या मोठ्या मुला करिता वधु पाहण्यास सुरुवात केली.स्थळ अतिशय उत्तम होते ,ह्यात दुमत नाही. अतिशय देखणा आणि सुस्वभावी मुलगा, वर सरकारी नोकरी , आणि विशेष म्हणजे (चहा सोडता) कुठले ही व्यसन नाही . साहजिकच बऱ्हाणपूरच्या अनेक स्थानिक वधुपित्यानी सर्व प्रयत्न करून पहिले , पण पहिली दोन वर्षें तरी उपयुक्त अशी वधू  तात्यांना  किंवा घरच्या मोठ्याच्या पसंतीस उतरली नाही. 1966 साली मी शहडोलच्या गवर्नमेंट कॉलेज मध्ये एम.एस.सी केमिस्ट्री मध्ये प्रवेश घेतला.वास्तविक मी बी.एस.सी झाल्या नंतर,ति.ताई वर आणखी जास्त आर्थिक भार पडू नये,- कारण चि.प्रकाश सुद्धा हायस्कूल मध्ये पोहचला होता,- ह्या दृष्टीने नोकरी करायचे ठरविले होते.बी.एस.सी झालेल्या नंतर भुसावळ येथील शाळेत मला पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये नोकरी मिळाली होती,व मला २० जून ला रजू होण्यास सांगितले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत बऱ्हाणपूरला आलेल्या तात्यांनी त्याच्या खूप विरोध केला आणि मला एम.एस.सी ला प्रवेश घेण्याचा आग्रह केला. वास्तविक तात्यां मुळेच मी एम.एस.सी करू शकलो. शहडोलच्या वास्तव्यात मला माझ्या मोठ्या झालेल्या भावाचे या आधी न कळलेले अनेक उत्तम गुण कळले. पण त्या विषयीचा उल्लेख आपण नंतर करूच. 1967 सालच्या सुरुवातीला दादांनी धुळे (पश्चिम खानदेश,महाराष्ट्र) येथील मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर  असलेले श्रीयुत तात्यासाहेब भुस्कुटे यांच्या एकुलत्या एक कन्या सुनंदा यांना तात्यांच्या वाग्दत्ता वधू म्हणून पसंती दिली. तात्यांची पसंती मिळाल्यावर, त्याच वर्षी १९ में, शुक्रवार रोजी उभयतांचा विवाह धुळे येथे थाटात संपन्न झाला. भुस्कुटे यांच्या घरील आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक, ‘अरुण’ बरोबर ‘अलका’ या नव्या नावाने माझी वहिनी, परांजप्यांच्या घरी आली. आल्याआल्याच त्यांच्या मोकळ्या स्वभावाचा प्रत्यय मला आला. त्यांनी आपल्या दोघांना दिरांना ‘मी जरी मोठी असली तरी मला अहो जाहो करायचे नाही’ असे अतिशय मनमोकळेपणाने सांगितले. 1967 च्या 27, 28 जूनला आम्ही बऱ्हाणपूर येथून आई बरोबर शहडोल ला आलो. आमची मोठी बहीण ति. सुशीला ताई, परिस्थिती मुळे स्वभावाने  काहीशी हट्टी आणि तापट होती. त्या मुळे तिला अशी शंका होती की या विवाहा नंतर मला शहडोल येथे अभ्यासा करायला किती अनुकूलता मिळू शकेल.मी तिला दोष देत नाही किंवा तिची चूक आहे असेही म्हणत नाही. पण परिस्थिती आणि पूर्वीच्या कटु अनुभवां मुळे मुळे कदाचित प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याचा तिचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नव्हता हे मात्र खरे.मी मात्र ह्या गोष्टींचा फारसा विचार केला नाही,कारण वास्तविकता वेगळीच होती.वहिनी आल्या नंतर मला आजिबात काम करावे लागले नाही,उलट अभ्यासा करता भरपूर वेळ मिळाला.फायनल ईयर च्या स्पेशलायझेशन करता बराच कठीण व किचकट कोर्स होता व फार मोठे प्रैक्टिकल्स असायचे,त्या मुळे कधी कधी घरी परतायला रात्री ८ ही वाजायचे, तरीही मला (व शेजारच्या घरात रहाणाऱ्या कमलेश शर्मा नावाच्या माझ्या वर्गमित्राला सुद्धा !!) गरम चहा/कॉफी मिळायची. रात्री ही अभ्यासाला बसल्यावर मला टेबलावर दूध देऊन मगच ते दोघे झोपायला जायचे, भले रात्रीचे बारा वाजोत !
           माझ्या पोस्ट ग्रेजुएशनच्या यशात तात्यांच्या बरोबरीने वहिनी सुद्धा बरोबरीच्या भागीदार होत्या, हेच नि:संशय खरे आहे.
           तात्यांचे बालपण दोन मुलींच्या पाठीवर येणारा भाऊ या दृष्टीने अतिशय कौतुकात गेले. आजींचे जरी लाड असले तरीही
आई आणि विशेष करून दादांच्या
कडक शिस्तीमुळे ते कधीही ‘लाडावलेला मुलगा’ या गटात आले नाही. या उलट आपल्या बहिणींशी ते अधिक दिलेला खाऊ (आजींच्या नकळत !!) नेहमी शेअर करायचे. अर्थात हे ताई व मंदाताईंनीच मला सांगितले होते. तरी ही यथायोग्य बालसुलभता व खट्याळपणा सुद्धा आपल्या जागेवर होताच. तात्या, जवळ जवळ आठ वर्षाचे असताना माझा जन्म झाला. त्यामुळे मी चार पाच वर्षांचा होई पर्यंत ह्या तिघांची ची तिकडी, बारा ते सोळा वर्षे वयाची झाली होती. त्यामुळे हे तिघे, लहान भावाला, अर्थातच आजींची नजर चुकवूनच, माझ्याशी थोडी फार चिडवा चिडवी आणि खोड्या करायचे. एकदा तर रिकाम्या गटारीत तुरुतुरु जाणार्‍या भल्या मोठ्या पिवळ्या विंचवाला,’रवी तो पहा खेकडा चालला आहे,जा त्याला पकडून आण, आपण त्याच्या पायात दोरा बांधून खेळूं’ वगैरे गंमत ही व्हायची.’मागील दारी नाल्या जवळच्या पेमली बोराच्या (मोठी बनारसी बोरं) झाडावर रात्री आस्वला चे भूत येतं असं हे मला सांगायचे ,’जर तू रात्री जाऊन त्याच्यावर चॉक ने कट्टस वरून आलास तर आपण सर्वांना एक दिवस भर स्वर्ग पहायला मिळेल !!!’ — तो बालिश अवखळपणा अजूनही त्या तिघां बरोबर परत जगावासा वाटतो.
तरी ही या तिघांनी त्यांच्या संगतीत भरपूर राहू दिल्यामुळे मी कमी वयातच बराच धीट (व आगाऊ, मूड !!) झालो. शाळेत जायला लागल्या नंतर मी लबाड्या सुद्धा खूप करत असे, पण तात्यांना त्याची पूर्वकल्पना कशीती नेमकी असत असे. त्यांच्या बरोबर राहून जवळजवळ सहा सात वर्षांपासून ते 21-22 वर्षाचा होई पर्यंत मी एका परीनं तात्यांचा अप्रेंटिस म्हणूनच असंख्य गोष्टी शिकलो. कोणी मनुष्य नुसत्या पाहून, काही आई वडिलांना विचारून, इतक्या गोष्टी शिकू शकतो, हा गुण असाधरण होत्या!
       त्या गमती ही मी थोड्या वेळात सांगणार आहेच. पण त्याच्या आधी टापटीप आणि शिस्ती विषयी. माझ्या मतें ताई, मंदाताई आणि तात्यां मुळेच आम्हा दोघा धाकट्या भावंडांना बर्‍यापैकी आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवणे कळू लागते. मी लहान असल्या पासून माझ्या आठवणीतील दादा (वडील) सायकल वरून फॅक्टरीमध्ये सकाळी सातला जात. त्या काळी सायकल असणे ही एक मोठी गोष्ट होती आणि प्रत्येक जण तिला अतिशय स्वच्छ ठेवत असे. ताई व मंदाताई सकाळी साडे सहाला शाळेत जात असत त्यामुळे तात्यांची ड्युटी दादांचे जोडे पॉलिश करून ठेवणे व सायकल स्वच्छ करणे ही होती. दर दिवशी नुसता फडकं न मारता, अतिशय पद्धतशीरपणे सायकल च्या रिम व स्पोक्स  सुद्धा पुसून स्वच्छ करावे लागत. तात्यांनी हळूहळू हे काम मला शिकवले व एक-दोन वर्षात अलगदपणे ते माझ्या गळ्यात पूर्णपणे अडकवले. पण ह्यात लबाडी नव्हती, प्रत्येक गोष्ट ते मला स्वतः करून दाखवत आणि मग करायला लावत. त्यांना आठवीत गेल्यावर स्वतःची सायकल मिळाली, व त्यांनी तिच्यावर प्रयोग सुरू केले. त्यावेळेस सायकलची पंक्चर नीट करणे हे एक मोठे तंत्र होते. त्यांनी सर्व यंत्रसामग्री जमा करून सायकल ची संपूर्ण ओवरॉलिंग, रिपेरिंग, पंचर काढणे मला शिकवले. ते सायकल वरून मला कटनी शहरात सायकलच्या दुकानात घेऊन जायचे आणि एक्सेल, कोन , ब्रेक शूज पासून ते अगदी वॉल बेरिंग पर्यंत सर्व वस्तू आणून उन्हाळ्यात/ दिवाळीत दोन्ही सायकल्सची ओवरॉलिंग करायचे. सायकलचा पंचर काढायला आम्ही कधीही दुकानात गेलो नाही.स्वभावाने तात्या अतिशय शांत,सोशीक आणि कधीही त्रागा न करणारे होते. पण प्रसंग आला की त्याचा राग काय होता हे मलाच माहीत आहे. एकदा काही तरी अशा प्रकारचे रिपेरिंग चे काम करीत असताना,(मला वाटते दादांच्या सायकलच्या ओव्हरआॅलिंग वरून असावे, कारण दादांना उन्हाळा, दिवाळीच्या सुट्ट्या नसायच्या, आणि त्यांच्या सायकलचे काम फक्त रविवारच्या एका दिवसात पूर्ण करावे लागे) माझ्या हातून (नकळत!!!?) काही तरी मोठी चूक झाली, त्यांचा चेहरा चिडून लालबुंद झाला, आणि अचानक त्यांनी मला जवळ पडलेली हातोडी उचलून ठपकन नाकावर मारली. माझ्या नाकातून रक्ताची धार लागली. ना मी भोकाड पसरले, ना तात्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.आईची चार बोलणी ऐकून , माझ्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवून रक्त थांबवण्यात आले, आणि परत गुरुजी आणि शागिर्द आपल्या कामावर हजर झाले!! विजेची कामें, तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू रिपेअर करणे, नव्या बनवणे, फोटोग्राफी, कॅमेऱ्यातील फिल्म डार्करूम मध्ये काढून तिचे डेव्हलपिंग आणि फिक्सिंग करून कॉन्टॅक्ट प्रिंटिंग ने पॉझिटिव्ह फोटो तयार करणे, रेडिओच्या रेजिस्टन्स चा कलर कोड ओळखणे, दिवाळीत आकाश कंदील बनवणे (गोल फिरणाऱ्या आकाशकंदीला चा एक प्रकार असतो – पायली, तो मात्र आम्हां दोघांना कधीही जमला नाही !!) शिलाई ची पाय मशीन नीट करणे, बुक बाइंडिंग, बॅडमिंटन, क्रिकेट खेळणे, पतंग उडवणे, अतिशय उंच झाडांवर न घाबरता चढणे (व प्रसंगी पडल्यास न रडणे) अशा अनंत गोष्टी व विद्या मी तात्यां कडून शिकलो. कटनी,भुसावळ आणि शाहजहांनपुर येथे आमच्या बंगल्यांच्या तिन्ही बाजूंनी भरपूर मोकळी जागा होती.तिथे दादांनी सकाळ-संध्याकाळ अतोनात मेहनत घेऊन, भरपूर मोठी फळा फुलांची आणि भाज्यांची बाग तयार केली होती. या कामामध्ये जवळजवळ सर्व कुटुंबच सहभागी होत असे.फुलबाग किंवा भाज्या म्हणजे नुसत्या इकडून तिकडून मागून आणलेल्या रोपां
बसून तयार केलेली जुजबी बाग नसायची. दादा आणि तात्या दोघं जण बसून मुंबईच्या ‘पेस्तनजी पोचा’ व ‘सटन सीड्स’ या कंपन्यां कडून विविध प्रकारची देशी व विदेशी फुलं व वेगवेगळ्या भाज्यांची बियाणे मागवत असत. वडिलां पासून मिळालेला हा छंद त्यांनी अगदी शहडोल पर्यंत जोपासला. त्या योगे मी म्हणू शकतो कि जर ते जर शिक्षक झाले नसते, तर एक उत्तम शेतकरी नक्कीच झाले असते.  
          त्यांना वाचनाची अतिशय आवड होती,व चांगली चांगली पुस्तकें (मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांची) ते लायब्ररी मधून,मित्रां कडून किंवा प्रसंगी शक्य झाल्यास विकत घेऊन,  स्वतः वाचत आणि मलाही वाचायला लावत. त्यांचीही एक मजेदार पद्धत होती, स्वतः एखादे पुस्तक वाचून झाल्यावर, ते मला त्या पुस्तकात काय विशेष आहे हे थोडक्यात सांगायचे, पण त्या मध्ये जी मजेदार किंवा गूढ गोष्ट असायची, त्याची फक्त हिंट देऊन सोडून देत.त्या मुळे मला ते पुस्तक उत्सुकते पोटी वाचायची इच्छा व्हायची. मला आठवते की एकदा त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या एका बंगाली कादंबरी चा हिंदी अनुवाद “हंँसली बांँक की आत्मकथा” नावाचे पुस्तक मात्र दोन दिवसा करता मिळवले. साधारण दोन अडीच किलोचे , साडेसहाशे पानांचे अतिशय जाडजूड पुस्तक होते. आम्ही दोघांनी दीड दिवसात त्या पुस्तकाचा फडशा पाडला, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते पुस्तक परत केले.
          हे सर्व पाहिल्यावर आणि अनुभवल्यावर मला ते गूढ उमगले कि त्यांना जळगाव बर्‍हाणपूर, शहडोल ,खिरसाडोह आणि विशेष करून संपूर्ण जबलपुर येथील त्यांचे विद्यार्थी व सहकारी ‘क्लासिक, युनिक आणि मॅजिकल टीचर’ का म्हणत असत. ह्या बाबतीत मला मात्र ते तेवढे जमले नाही, त्यांनी दिलेला कानमंत्र मी अजून इतर ज्यूनियर शिक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो. ते म्हणत असत, की जरी तुम्हाला विषय हस्तकमलावगत माहीत असला, तरीही काही तरी नवे शोध, विचार, शिकवण्याच्या एखाद्या नव्या अॅप्रोच ची पद्धत अशी उरलेली असतेच, त्याच्या करता तुम्हाला दर दिवशी, विषय नव्याने तयार करणे जरुरीचे असते. विषयवस्‍तु एक गोष्ट असते आणि ती जागत्या आणि जाणत्या विद्यार्थ्यां समोर,सर्व श्रेणींच्या विद्यार्थ्याना कळेल अशा पद्धतीने, उलगडून समजावणे ही दुसरी गोष्ट असते व तोच सर्वात मोठा चॅलेंज असतो. तिसरी गोष्ट ही लक्षात ठेवावी की जर तुमच्या एखाद्या सामान्य विद्यार्थ्याला, एखादा टॉपिक एक वेळा शिकवल्या वर पूर्णपणे समजला नाही, तर तुम्ही एक शिक्षक म्हणून हरलात हे शाश्वत सत्य असते.त्यामध्ये विद्यार्थ्याची चूक नसते,तर शिक्षकाच्या प्रयत्नात कमतरता असते. या सर्वांवर उपाय एकच, आणि तो म्हणजे अध्यवसाय.तो टॉपिक परत परत नव्या तऱ्हेने तयार करा.
             याच्या शिवाय त्यांना अनेक कला अवगत होत्या, ज्या मला कधीच जमल्या नाहीत. त्या पैकी पहिली, त्यांना शिवण कला अतिशय सुंदर येत असे, अगदी कटिंग सकट! दुसरी, जी मला सोडून ताई व मंदाताईला  माहित आहे, ती म्हणजे गायन कला!!! होय,अगदी क्लासिकल नाही तरीही सिनेमा ची गाणी ते छानच म्हणायचे.आमच्या घरी इतर सर्व कला असल्या तरी गान सरस्वती,कोणा वर फारशी प्रसन्न नव्हती‌.म्हणून ह्याचे कौतुक विशेष. मला वाटते आता पुरे झाले.पाककला, सजावटीच्या वस्तू बनवणे, नकला आणि भाषण कला वगैरे वगैरे असंख्य गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पण ते नंतर.कारण जर मी आता त्यांच्या बद्दल बोलू लागलो, तर
असे वाचक,जे त्यांना नीट ओळखत नाहीत,ते बहुतेक तरी असे समजतील कि हा गृहस्थ आपल्या मोठ्या भावा विषयी फारच अतिशयोक्तीपूर्ण गप्पा मारायला लागला आहे.
                तात्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यां  विषयी मी ह्या व्यक्तिचित्राच्या शेवटच्या, अर्थात दुसर्‍या भागात, अधिक लिहिन.पण ते अतिशय सोशिक आणि शांत स्वभावाचे होते व हा गुण दोन गोष्टीं मुळे अधिक प्रकर्षाने महत्त्वाचा होतो.एक तर दोन बहिणींच्या पाठीचा हा पहिला मुलगा ,सर्वांचा अतिशय लाडका, तरीही त्यांनी कधीही त्याचा गैरफायदा घेऊन हेकेखोरपणा केला नाही व सदैव सौम्यच राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठचा भाऊ म्हणजेच मी, स्वभावाने अतिशय तापट आणि हट्टी, कदाचित या कारणाने त्यानीं आपल्या हौसा मौजाना बरीच मुरड घातली असणार. मला या गोष्टीची थोडी कल्पना आहे, कारण म्हणतात ना की, ‘जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण !’ निरपेक्षपणे त्यांच्या जीवनाकडे पाहिले कि असे वाटते – अरे हा गृहस्थ इतका साधा आणि निगर्वी कसा ? असो.
       तात्या माझ्या जीवनातील एक अशी व्यक्ती होते, त्यांच्या विषयी फार थोड्या गोष्टी सांगितल्या. खूप काही सांगणे मनात राहून गेले. कविवर्य भा.रा. तांबे यांनी एका गाण्यात म्हटले आहे खरे,
‘मी जाता राहील कार्य काय,
जन क्षण भर म्हणतील हाय हाय.’
       हे तर आहेच, पण तरीही, आपल्या जीवनात काही व्यक्ती असतात, ज्यांच्या विषयी आठवणींची एक अखंड ज्योत मनात तेवत असते, म्हणूनच आपण त्यांची नक्कल करून त्यांच्या सारखे व्हायचा प्रयत्न करत असतो. जीवनात अशा लोकां मुळेच कुठेतरी दूर जळत असलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध , आठवणींच्या रूपात सदैव दरवळत असतो.
***********************
रवींद्र परांजपे,
+919644032329
rpparanjpe@gmail.com
      

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s